छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गुजरात येथून ट्रॅव्हल्सने बटण आणि कफ सिरप शहरात येत असल्याचे समोर आले आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पथकाला पाहून आरोपीने धूम ठोकली. परंतु तब्बल दोन हजार टॅब्लेट बटण आणि ११८ कफ सिरच्या बॉटल असा ९ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि. २१) नगर नाका परिसरात करण्यात आली. सय्यद अझर सय्यद अकबर (रा. चांदमारी, छावणी) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबतचा तपशील असा की, सय्यद अझर हा सुरत (गुजरात) येथून ट्रॅव्हल्स बसद्वारे मोठ्या प्रमाणात नशेची औषधे शहरात आणत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्या आधारे पथकाने नगरनाका परिसरात सापळा रचला. ट्रॅव्हल्समधून उतरताच त्याला पोलिस दिसल्याने त्याने माल असलेली बॅग सोडून तेथून धूम ठोकली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात दोन हजार टॅब्लेट आहेत. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पसार आरोपीचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजित टिके, उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक दिपाली पाटील, सहायक फौजदार विश्वास शिंदे, हवालदार नितीन जाधव, हरीश मुंढे, अतुल तुपे, राहुल काळे, ज्योती कीर्तिकर, आम्रपली सूर्यवंशी, प्रियंका पवार यांनी केली.
लाखाचे करायचा दहा लाख !
सय्यद अझरचे दोन भाऊ नशेच्या कारभारात आहेत. त्यांच्यावर चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. दहापट जास्त नफा मिळत असल्याने सय्यद अझर या व्यवसायाकडे वळाला. लाखभर रुपयांत आणलेल्या मालाचे तो दहा लाख करायचा. शॉर्टेज असेल तर ही रक्कम अजून वाढायची. अंधा फिरोज या त्याच्या भावाचा परिसरात चांगलाच दबदबा आहे. अझर मात्र पहिल्यांदाच पोलिस रेकॉर्डवर आला आहे.












